मानसिक मृत्यू हाच सत्य साक्षात्कार करण्याचा एकमेव मार्ग आहे
मृत्यूविरुद्ध प्रखर प्रतिकार करून, अनेक मार्गाने झगडून अखेर आपणास हे जग सोडून जावे लागते
पण कसलाही प्रतिकार न करता, दुःखी जीवन न जगता, आत्महत्येचा विचार सुद्धा न करता, चांगले आरोग्य असताना आणि जिवंत असताना आपणास मृत्यूच्या घरात प्रवेश करणे शक्य होईल का?
होय, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा मन त्याच्या मी पणाला म्हणजे स्वतःला मारते. आपली समस्या हि शारीरिक मृत्यूची नाही, तर मनाने शतकानुशतके जमवलेल्या त्याच्या पारंपरिक माहिती संग्रहातून, सतत वाढत जाणाऱ्या स्मृतीतून, त्याने स्वत:ला अधिक बळकट करणे ही आहे.
मन स्वतःला स्वतःच्या बंधनातून मुक्त कसं करू शकतं? एकतर बाहेरील शक्ती आवश्यक आहे, नाहीतर भूतकाळाने कलुषित झालेल्या मनाच्या अशुद्ध भागाला मनाच्या काळ विरहित शुद्ध आणि पवित्र भागाने हस्तक्षेप केला पाहिजे.
बाहेरील शक्तीचा जो काल्पनिक प्रभाव ग्रहीत धरला जातो त्यानेच त्याच्या परंपरा, श्रद्धा आणि संस्कृतींनी मनाला कलुशित केले आहे. जर बाहेरची शक्ती गृहीत धरली तर ती मनाच्या पलीकडची गोष्ट असेल म्हणजे मन कोणत्याही स्वरूपात त्याला स्पर्श करू शकणार नाही.
विचार हा मानसिक काळाचा परिणाम आहे; विचार हा भूतकाळाशी जोडलेला असतो, तो भूतकाळापासून कधीही मुक्त होऊ शकत नाही. जर विचार भूतकाळापासून मुक्त झाला तर तो विचार म्हणून शिल्लक रहात नाही. जे मनाच्या पलीकडे आहे त्यावर विचार ऊहापोह करणे निव्वळ व्यर्थ आहे.
मनाच्या आणि विचारांच्या पलीकडे असलेल्या शक्तीच्या हस्तक्षेपासाठी, मनाचा व्यर्थ विचार करणे थांबले पाहिजे. मन हे कोणत्याही काल्पनिक हालचालीशिवाय असले पाहिजे, ते संकल्प विकल्प रहित स्थिर समाधिस्थ असले पाहिजे. मन त्याच्या पलीकडील अवस्थेला आमंत्रण देऊ शकत नाही.
मन हे स्वतःच्या कृतींना उदात्त आणि उपेक्षित, वांछनीय आणि अनिष्ट, उच्च आणि निम्न असे विभागू शकते आणि तसे ते करते, परंतु हे मनाचे सर्व विभाग आणि उपविभाग हे मनाच्याच सीमांमध्ये आहेत; त्यामुळे मनाची कोणतीही हालचाल, कोणत्याही दिशेने, ही भूतकाळाची, 'मी'ची, काळाची प्रतिक्रिया असते.
या सत्याचे आकलन होणे हीच एकमेव मुक्ती देणारी व्यवस्था आहे, आणि ज्याला हे सत्य कळत नाही तो नेहमी मनाच्या बंधनात अडकलेला असेल. मनाच्या बंधनात राहून त्याला जे काही करता येईल ते त्याने करावे, परंतु त्याचे सर्व प्रयत्न, त्याची तपश्चर्या, व्रत, शिस्त, त्याग, योग, ध्यान यांचे भौतिक महत्त्व असू शकते, परंतु जीवनाच्या सत्य साक्षात्कार संबंधात त्यांची किंमत शून्य आहे.
J. Krishnamurti, Series II - Chapter 51 - 'Death', Commentaries on Living
भौतिक अनुभव स्मृतीमध्ये साठवला की त्याची माहिती मध्ये रूपांतरण होते. स्मृतीमध्ये साठवलेली माहिती ही नेहमीच भूतकाळात होऊन गेलेल्या घटनांची नोंद असते. माहिती हि वास्तविक नसून भूतकाळातील अनुभवाची स्मृती मधील प्रतिमा असते, म्हणून कसलीही माहिती हि कधीही वास्तविक नसते. जीवन जगण्यासाठी काही माहिती हि आवश्यक आहे.
स्मृतीमध्ये साठवलेल्या माहितीचा प्रतिसाद हेच विचार आहेत. यातील एक विचार स्वतःला मी समजतो आणि हा मी स्वतःला इतर विचारांपासून वेगळा करतो. ही स्मृतीत झालेली मानसिक विभागणी आपल्या जीवनात सतत विभागणी करत राहते आणि त्यांच्या विभागणी मध्ये संघर्ष निर्माण करत असते, आणि हि विभागणी आणि त्यामधील संघर्ष हेच मी याला त्याचे मानसिक जीवन टिकवून ठेवण्यास मदत करत असते.
जेव्हा विचार सुरू होतात तेव्हा मी प्रकट होतो आणि मानसिक वेळ सुरू होते. विचार, मी आणि मानसिक वेळ हे एकाच मानसिक जीवनाचे वेगवेगळे पैलू आहेत. जेव्हा एखाद्याला हे सत्य समजते की खरोखरचे विवेकी जीवन जगण्यासाठी मानसिक जीवन आवश्यक नाही, तेव्हा तो मानसिक जीवनातून मुक्त होतो आणि हाच मानसिक मृत्यू आहे.
मानसिक मृत्यूनंतर ती व्यक्ती त्याच्या वास्तविक जीवनाशी समरुप होते. विचार जे मानसिक आहेत ते प्रत्यक्ष जीवनाबद्दल काहीही सांगू शकत नाही. विचार रहित अवस्थेतील विवेकी जीवन अनुभवण्यासाठी आणि त्याचे वर्णन करण्यासाठी विचार शिल्लक असत नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा