आत्मज्ञान

मनुष्यप्राणी हा मुळातच अतार्किक आहे, अविवेकी आहे यामुळे त्याच्या जीवनामध्ये प्रचंड अव्यवस्थितपणा निर्माण झाला आहे त्याचे जीवन त्याला सूव्यवस्थित करण्यासाठी त्याला तार्किक व विवेकी बनणे अत्यावश्यक आहे. 

विवेकी बनण्यासाठी प्रथम पायरी ही आहे कीं मी अविवेकी आहे हे स्वतःस कळले पाहिजे व ते कबूल करायला हवे. हे पूर्ण समजेतून कबूल केले की तत्क्षणी तो मनुष्य विवेकी बनतो. पूर्ण विवेकी मनुष्यास आत्मज्ञान प्राप्त होते. 

अविवेकी पणा विचारांच्या मुळे निर्माण होत असतो. विचार म्हणजे मेंदूमधील स्मृतींची हालचाल होय. स्मृती म्हणजे मेंदूमध्ये साठविलेले अनुभव व पूर्वज्ञान होय. आत्मज्ञानी मनुष्य मेंदू अर्थात मेंदूमधील विचारांचा वापर न करता प्रत्यक्ष आत्मज्ञानी विचार त्याच्या मुखातून बाहेर पडत असतात !!!

आत्मज्ञान किंवा आत्मज्ञानी विचार हे मेंदूमधील साठवले गेलेले पूर्वीचे विचार, पूर्व अनुभव, पूर्वज्ञान त्यांचा वापर करत नाही.

आत्मज्ञानाची अवस्था कशी प्राप्त करावी? 

आत्मज्ञानाची अवस्था ही कालातीत अवस्था आहे. काळ हा आत्मज्ञानी अवस्थेचा आधार होऊ शकत नाही. काल म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लागलेला वेळ होय. विचारांचा जन्म ते विचारांचा अंत यामधील लागलेला वेळ म्हणजे काळ होय. तसेच मन भूतकाळातील अनुभवांचा मागोवा घेत भविष्यकाळाच्या योजना आखत असते यासाठी विचारांना काळाचा आधार घ्यावा लागतो. मी चा जन्म या काळामध्ये होत असतो. मन म्हणजे मी ला होणारे ज्ञान, विचार, अनुभव, स्मृती होय. मी च्या अस्तित्वासाठी काळ हा मूलभूत घटक आहे. परंतु आत्मज्ञान साठी मी, विचार, मन व काळ हे अडथळे ठरतात.

मन हे स्वतः कालातीत होऊ शकते का व कसे?

सर्व संवेदना, सर्व भावना, सर्व श्रद्धा यांच्या विचारांचे अव्याहत चालणे म्हणजे काळ होय. मनाला झालेल्या संवेदना, वेदना, जाणीव, नेणीव आदि सर्व मनोभावना यांचे एकदा अवलोकन करून तात्काळ त्यांना तिथेच सोडून देणे, पुढे घेवून न जाणे म्हणजे काळाचा अंत होय. 

आपल्या मनाने आपल्या अनेक प्रतिमा तयार केलेल्या असतात. कुटुंबातील मी, समाजातील मी, ऑफिसमधला मी, मित्रमंडळी मधला मी, नातेवाईक मधला मी वगैरे. या प्रत्येक प्रतिमांच्या भावना वेगवेगळ्या असतात, या भावनांना मान-अपमान, आदर, प्रेम, तिरस्कार अशी वेगवेगळ्या संवेदना होत असतात. प्रत्येक प्रतिमेस बऱ्या-वाईट संवेदना, मानापमान होत असतात. प्रत्यक्षात आपल्या मूळ अस्तित्वास प्रतिमांना होणारी जाणीव होत नसते. मानसिक प्रतिमेला होणाऱ्या जाणिवा या आपल्या नाही याचे आकलन आपल्या मूळ अस्तित्वास होताच त्यांच्याशी निगडित असणारा काळ समाप्त होतो !!!

व्यावहारिक जगात वावरताना मनाने स्वतःसाठी आपल्या असंख्य प्रतिमा बनविलेल्या असतात या प्रतिमा व आपले वास्तविक अस्तित्व यांचा सुतराम संबंध नसतो. या प्रतिमा हेच मी चे स्वरूप असते, प्रतिमांना महत्त्व दिल्याने जीवन अव्यवस्थित, अतार्किक होत असते. याचे ज्ञान होणे म्हणजेच आत्मज्ञान होणे होय. 

https://youtu.be/rEigSwGycV0



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मानसिक मृत्यू हाच सत्य साक्षात्कार करण्याचा एकमेव मार्ग आहे

मी कोण आहे?

जीवनाची जटीलता