उपजीविकेची समस्या


प्रश्नकर्ता : एक वेगळ्या प्रकारचे अनिश्ररवादी जीवन जगण्याची इच्छा असेल तर, बेकारी व मर्यादित संधी असलेल्या या जगात एखाद्याने उपजीविकेच्या समस्येकडे कशा प्रकारे पाहावे?

कृष्णमूर्ती : त्यासाठी वेगळ्या स्वरूपाची सरकारे सत्तेवर आणणे जरुरीचे आहे—असे सरकार की,जे एका विशिष्ट गटापुरते मर्यादित नसेल. फ्रेंच सरकार, इंग्लिश सरकार व असे प्रत्येक सरकार फक्त आपआपल्या मर्यादित क्षेत्रापुरती काळजी घेत असते. आणि समस्या तेथेच आहे. सर, एक मानवजात या स्वरूपात काम करण्यापासून कोण आपणाला परावृत्त करीत आहे ? राष्ट्रीयत्व, धर्म व परंपरा यांनी आपण विभक्त झालो आहोत आणि त्यांना कवटाळून बसलो आहोत. जागतिक अशी अर्थव्यवस्थाच नाहीये. तुम्हाला समजतंय ना? या सर्वासंबंधी तुम्ही कधी विचार केलाय की नाही याचेच मला आश्चर्य वाटते. जागतिक स्वरूपाची अर्थव्यवस्था नाहीये. प्रत्येक देशाला त्याची त्याची अर्थव्यवस्था, त्याचे कायदेकानून, एका विशिष्ट जमिनीच्या तुकड्याबरोबर असलेले त्याचे व्यक्तिगत सारुप्य याचीच पर्वा असते. युरोपचे कधीही एकीकरण होऊ शकत नाही. कारण त्यामुळे प्रत्येक राष्ट्राला कोणत्या ना कोणत्या प्रकारे काहीतरी सोसावे लागेल. म्हणून जोपर्यंत आपल्याकडे स्थानिक स्वरूपाची व संकुचित वृत्तीची सरकारे आहेत, तोपर्यंत बेकारी व संधीचा अभाव यासारख्या गोष्टी जगात असतील. परंतु आता आणखी एक घटक यात प्रवेश करीत आहे आणि तो म्हणजे संगणक. संगणक हा कोणत्याही राष्ट्रीयत्वाच्या, कोणत्याही सरकारच्या पलीकडे आहे. विचार करण्यात तो आपल्याला मागे टाकू शकेल. तो स्वतःच स्वतःचा देव निर्माण करू शकेल आणि आपण सर्व त्याची पूजा करू. या संदर्भात एक चांगला विनोद आहे, पण तो तितकासा महत्त्वाचा नाही. मी तो पुन्हा एकदा सांगायला हवा का?

प्रश्नकर्ता : हो.

कृष्णमूर्ती : एक माणूस संगणकाला म्हणतो की, "देव नसतो, माझा कधीही देवावर विश्वास नव्हता." संगणक म्हणतो, "पण आता तुम्हांला देव मिळाला आहे." 

     म्हणून जोपर्यंत आपण अमेरिकन, ब्रिटिश, फ्रेंच, इटालियन, हिंदू, साम्यवादी व समाजवादी आहोत तोपर्यंत जगात कधीही शांतता नांदू शकत नाही. तेथे नेहमीच बेकारी असेल, नेहमीच युद्ध होतील. कृपया हे सर्व पाहा. तुम्ही यातील सत्य जेव्हा पाहता, तेव्हा तुम्ही कोणताही देश, कोणताही गट, कोणत्याही धर्माशी संलग्न राहत नाही. पण त्यामागे उत्कटता हवी, केवळ बौद्धिक कल्पना नकोत. म्हणून अशा परिस्थितीत उपजीविकेच्या समस्या अधिकाधिक कठीण होत जातात. परिस्थिती जर अशीच राहिली तर आणखी युद्धे होतील. मला माहीत नाही की, तुम्ही हे ऐकले आहे किंवा नाही-- मला सुद्धा काही दिवसांपूर्वीच ते सांगण्यात आले आहे-- रशियामध्ये एका ॲटम-बाँबचा स्फोट झाला आहे व त्यामुळे शेकडो मैलांच्या परिसरात पुढील पंचवीस हजार वर्षे काहीही उगवू शकणार नाही, त्या परिसराच्या जवळपासही कोणी फिरकू शकणार नाही.मी काय म्हणतोय ते तुमच्या लक्षात येतंय ना? मानवजात ही अशी आहे. आणि कोणालाही त्याची पर्वा नाही. तुम्ही निदर्शने करू शकता, परंतु त्या निदर्शनांचा कसा उपयोग करून घ्यायचा ते राजकारणी लोक उत्तम प्रकारे जाणतात. म्हणून आपल्यापैकी प्रत्येकजण, जो हे ऐकत आहे, जोपर्यंत ज्यू, अरब, हिंदू, मुस्लीम ब्रिटिश अशा प्रकारच्या विभाजनातील धोका खरोखर पाहत नाही, तोपर्यंत आपणाला सातत्याने असुरक्षितता व युद्ध यांच्या सोबत राहावे लागेल.


जे. कृष्णमूर्ती, ब्रॉकवुड पार्क, १ सप्टेंबर १९८३, २ री जाहीर प्रश्नोत्तर सभा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मानसिक मृत्यू हाच सत्य साक्षात्कार करण्याचा एकमेव मार्ग आहे

मी कोण आहे?

जीवनाची जटीलता