वैश्विक शक्ती, गुरु, सत्संग मदत करू शकतात काय?

 

Dialogue between J Krishnamurti and Jacob Needleman


विचार हे नेहमी त्याने गोळा केलेल्या माहितीवर मंथन करत असतात. ज्यावेळी ते कंटाळतात त्यावेळी ते इतर नवीन गोष्टींच्या मागे लागतात. या नवीन गोष्टी परत त्याच्या माहितीचा भाग बनतात. विचारांना माहितीच्या जंजाळात भरपूर वाव असतो. परंतु जेव्हा आपण मला माहिती नाही असे म्हणतो तेव्हा विचार तिथे थांबतात. विचारविहिन अशी ती वैश्विक बुद्धिमत्तेची अवस्था असते. 


Dialogue no 01 : https://youtu.be/hhfdRE1wONY



वैश्विक शक्ती, सद्गुरु, सत्संग मदत करतात काय?


JN: आपण असे म्हणता की मनुष्याने स्वतःच स्वतःचा मार्ग शोधायला हवा. यामध्ये मग वैश्विक सत्तेचा काही भाग नसावा काय? 


JK: वैश्विक शक्ती, नियंता म्हटले की अवकाश आले आपण त्या विषयी बोलायचे आहे काय?


JN: नाही.


JK: मग आपल्या आतील अवकाश संबंधी?


JN: दोन्हींचा विचार आवश्यक ठरेल.


JK: बाह्य अवकाश अनंत आहे, आतील मर्यादित आहे. आपल्या आतील अवकाश आणि बाहेरील अवकाश यांचा संबंध आहे काय? आपल्या आतील अवकाश म्हणजे मिच्या सभोवतालची मोकळी जागा, दोन विचारांतील अंतर होय. ही आतील पोकळी मर्यादित आहे म्हणून आपण बाहेरील अमर्यादित अवकाशाची कल्पना करतो, त्याच्याशी एकरूप होण्याची इच्छा धरतो. आपल्या मीच्यां केंद्रामुळे आतील विश्व छोटे राहते. मी स्वतःचे वेगळे अस्तित्व तयार करतो, त्याच्या मर्यादित अवकाश व्यतिरिक्त दुसरे अमर्यादित असे काही वैश्विक असावे काय? त्या अमर्यादित अवकाशा बद्दल ईश्वर, ब्रम्ह, परब्रम्ह असे काहीही संकल्पना करायला माझा मी नेहमी तयार असतो. 


माझ्या मी चे जे केंद्र आहे ते प्रथम स्वतःचा भास तयार करते, स्वतःभोवती सांसारिक कल्पनांचे जाळे तयार करते, त्या जाळ्याच्या कडेला माझे पणाची (कुटुंब, समाज, देश, धर्म) सीमा आखते आणि त्या सीमेपलीकडे वैश्विक शक्तीच्या कल्पना रंगविते. हे मी नामक केंद्राच्या लक्षात आले की मी ची वरील सर्व उतरंड ढासळते. मीचे ते केंद्र नाहीसे झाल्या शिवाय कोणीही त्या अमर्याद अवकाश बद्दल जाणू शकणार नाही. मिचे केंद्र हाच द्रष्टा, दृष्य, अनुभव करणारा असे द्वैतपणा निर्माण करीत असतो आणि तोच सीमेच्या आतील सगुण साकार आणि सीमेच्या बाहेरील निर्गुण निराकार अशी विभागणी करीत असतो. मी मुळे आतील आणि बाहेरील एक करण्यासाठी साधनांचे पुल बांधले जातात. आपण मी ची हालचाल बंद करू शकलो तर हे सर्व थांबू शकते. 


JN: मी का शांत होत नाही? 


JK: त्याची जागा मर्यादित आहे त्याला त्याची जागा सतत वाढवायची असते.


JN: परंतु ते मिला समजत नाही, त्याच्या धार्मिक विचारांमुळे


JK: आपण ते धार्मिक लोकांकडून समजून घेण्याचा प्रयत्न करतो. इतरजन आपणास ते पवित्र आहे, ईश्वरीय आहे असे सांगतात आणि आपण भीतीपोटी तेच स्वीकारतो. खरेच तसे काही पवित्र, दैवी आहे काय? ते कसे शोधू शकतो? ज्यावेळी मन संपूर्ण शांत असते, प्रचंड अवकाश असतो त्याचवेळी त्याचा साक्षात्कार शक्य आहे. आणि जोपर्यंत मी नामक केंद्र आहे तोपर्यंत ते शक्य नाही. जेव्हा केंद्र नसते तेव्हा अपूर्व अवकाश असतो त्यामध्ये जी शांत अवस्था आहे तीच पवित्र आहे. ती अवस्था आपला मी जानु शकत नाही. त्याची कल्पना करणे, त्या विषयी चर्चा करणे हे मींच्या वल्गना आहेत. मला व्यक्तिशः त्यामध्ये अजिबात स्वारस्य नाही, ते सर्व विचारवंतांचे खेळ (philosophers pleasures) आहेत.


आपण मनाच्या केंद्रापासून स्वतंत्र होवू शकतो काय? जे मनुष्य ते करू शकत नाहीत ते काल्पनिक ईश्वराच्या भजनी लागतात. आपला मी ईश्वराच्या नावाने आपले अजून एक केंद्र तयार करतो. अशी विविध केंद्रे मनाच्या विविध शाखा बनतात आणि तेच आपले चेतन मन बनते. या सर्व शाखातील माहिती हेच चेतन मन आहे. आपण आपले मन शून्य करू शकतो काय? आपले मन त्याचे आधारस्तंभ काढू शकतो काय? बाहेरच्या मदती शिवाय आपले आपण ते करू शकतो काय? काही न करता आपले मन शून्य होवू शकते काय? मनातील संकल्प विकल्प काढून टाकून फक्त निरागस मन टिकविता यायला हवे. बाह्य मदत किंवा बाहेरून काही करणे म्हणजे ती परत चेतन मनाची कृती ठरेल. ते नेमके कशाने होते, कसे होते ते खरेच माहिती नाही. आणि त्याचा शोध घेता येत नसल्यामुळे आपण मग ईश्वर, ब्रम्ह, परब्रम्ह आदींच्या संकल्पना मांडीत जातो. परंतु जर आपण आपले मन शून्य करू शकलो नाही तर आपले जीवन दुःखमय असू शकते. यातून मार्ग काढणे हेच खरे ध्यान आहे. मन शून्य होणे ही वैश्विक कृती असावी, ती साहजिकच अज्ञात असणार. मनातील ज्ञात विचार आणि अज्ञात यांचा काही संबंध असावा काय? ज्ञात विचारातून अज्ञातात उडी मारणे यासाठी वैश्विक बुद्धिमत्ता अत्यावश्यक आहे. 


आपण स्मृतीमध्ये नवीन माहिती साठवण्याचे बंद करायला हवे, कोणत्याही संकल्पना मध्ये गुंतता कामा नये, यामुळे स्मृती मध्ये नवीन प्रतिमा तयार होण्याचे थांबले जाते. जर ते केले नाही तर आपला विनाश अटळ आहे. जेव्हा आपला कोणी अपमान केला किंवा आपली स्तुती केली त्यावेळी त्याची प्रतिक्रिया उमटू न देता फक्त स्थितप्रज्ञ राहणे जमले तर ते शक्य आहे. नवीन माहिती, नवीन संकल्पना, नवीन प्रतिमा बनणे बंद होते. आपण नवीन प्रतिमा बनविल्या नाहीत तर जुन्या प्रतिमांना काही मूल्य राहणार नाही. (प्रतिमा म्हणजे अनुभवांचे मेंदूमधील साठवणूक, प्रत्येक अनुभव त्याची छाप मेंदूमध्ये उठवीत असतो).

जर आपण नवीन प्रतिमा बनवल्या तर त्यांचा जुन्या प्रतिमांशी संबंध जुळवला जातो आणि ती प्रक्रिया अखंड चालू राहते. 


JN: जर आपण नवीन प्रतिमा बनविल्या नाहीत तर आपले भूतकाळाशी जडलेले नाते संपुष्टात येवू शकते. 


JK: अशारीतीने मन त्याचे प्रतिमा बनविण्याचे कार्य बंद करू शकते. शुण्यत्वाची पोकळी तयार होऊ लागते. त्यातूनच जीथे कोणताही धर्म, कोणताही विचार पोहोचू शकत नाही असा पवित्र मार्ग सापडू शकतो.


JN: सद्गुरु, सत्संग आपणास यासाठी मदत करू शकतील काय?


JK: त्यांच्या मध्ये सत्य असावे म्हणून आपण त्यांच्याकडे आकर्षिले जातो. त्यांच्याबरोबर राहून आपण आपल्यालाच ओळखण्याचा प्रयत्न करीत असतो. आपल्यामध्ये सत्प्रवृत्ती आहे म्हणून आपण त्यांच्याबरोबर राहणे पसंत करतो. मग आपल्याला त्यांची आवश्यकता आहे काय? किंवा जर मी सत्प्रवृत्त नाही मग त्यांच्यामुळे माझे अज्ञान दूर होईल या आशेने आपण तिथे जातो काय? आपणास आपले अज्ञान जाहीर करण्यासाठी तिथे जावेसे वाटते काय? या नंतरही मला त्यांची आवश्यकता भासत असेल तर माझे मला काही समजत नाही. नासमझ स्थितीमध्ये मी तिथे नुसताच अडकून राहू शकेल. हेच आपल्या इतर सर्व नातेसंबंधांमध्ये होत असते. सर्वत्र आपण लोंबकळत आणि ताटकळत राहत असतो. 


एखादाच असे सांगू शकतो की मी आपणास काहीही शिकवू शकत नाही, माझ्यावर अवलंबून राहू नका, मी फक्त रस्ता दाखवू शकतो चालायचे तुम्हालाच आहे. तो कोणतेही पळवाट शिल्लक ठेवत नाही दुसरा पर्याय शिल्लक ठेवत नाही. जर आपण खरोखरीच सत्प्रवृत्त असेल तर आपणाला कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. 


DONT DEPEND.

हेच ते सत्य आहे आणि आपणास ते आपल्यामध्ये बिंबवायचे आहे. 


https://youtu.be/LD7_Lp9XrTQ








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मानसिक मृत्यू हाच सत्य साक्षात्कार करण्याचा एकमेव मार्ग आहे

मी कोण आहे?

जीवनाची जटीलता