कृष्णमूर्ती यांच्या शिकवणुकीचा गाभा

 


जीदू कृष्णमूर्ती यांनी १९२९ मध्ये जे भाषण केले होते त्यात त्यांच्या शिकवणुकीचा गाभा आहे.


"सत्य ही मार्गरहित भूमि आहे. मनुष्य कोणत्याही संप्रदायद्वारे, कोणत्याही पंथातून, कोणत्याही धर्म-शास्त्राद्वारे, गुरु किंवा पुजारी यांच्याद्वारे किंवा कर्मकांडद्वारे, कोणत्याही तत्वज्ञानाच्याद्वारे किंवा मानसिक तंत्राद्वारे तिथे येऊ शकत नाही. त्याला ते नातेसंबंधाच्या आरश्यातून, स्वतःच्या मनातील माहिती समजून घेऊन, निरीक्षणाद्वारे शोधावे लागेल. बौद्धिक विश्लेषण किंवा अंतर्निहित विच्छेदनातून नव्हे. 

स्वसंरक्षणाचे कुंपण म्हणून मानवाने स्वत: मध्ये धार्मिक, राजकीय, वैयक्तिक प्रतिमा तयार केल्या आहेत. या प्रतिमा नंतर प्रतीक, कल्पना, श्रद्धा म्हणून प्रकट होतात. या प्रतिमांचे ओझे मनुष्याच्या विचारांवर, त्याच्या नातेसंबंधांवर आणि दैनंदिन जीवनावर अधिराज्य गाजवते. या प्रतिमा हेच आमच्या समस्याना कारणीभूत आहेत कारण त्या माणसाला माणसा पासून विभक्त करतात. जीवना बद्दलची मनुष्याची धारणा त्याच्या मनात आधीपासूनच स्थापित केलेल्या या प्रतिमांच्या संकल्पने नुसार बनते. त्याच्या चेतनेतील हि संकल्पनांची सामग्री हेच त्याचे संपूर्ण जीवन बनते. मनुष्याची वैयक्तिक ओळख, त्याचे व्यक्तिमत्व हे त्याचे नाव, त्याचा आकार आणि वरवरची संस्कृती आहे जी त्याला परंपरा आणि आसपासच्या परिस्थिती पासून प्राप्त होते. माणसाचे वेगळेपण हे केवळ वरवरच्या चेतनेमध्ये नसून त्याच्या चेतनेतील सामग्री पासून संपूर्ण स्वातंत्र्यात आहे. त्याची चेतना हि सर्व मानव जातीसाठी सामायिक आहे, चेतनेच्या जाणिवेच्या या अर्थाने म्हणून मानव वैयक्तिक नाही. 

मुक्तावस्था निवड करून मिळत नसते, ती कशाच्या तरी प्रतिक्रियेत नसते. मनुष्य निवड करू शकतो याचा अर्थ तो मुक्त आहे असा नाही. मुक्तता हि फक्त शुद्ध निरीक्षण आहे कोणत्याही हेतू शिवाय, कोणत्याही पूर्वग्रह शिवाय, पाप आणि पुण्याच्या विचारा शिवाय. मुक्तता हि आयुष्याच्या अंतिम क्षणी नसून आपल्या अस्तित्वाच्या पहिल्या आणि प्रत्येक क्षणात आहे. पूर्वग्रह विरहित निरीक्षणामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनशैली आणि कर्मामध्ये आपण निवड न करता केलेल्या निरिक्षणातून आपणास आपल्या गुलामीची जाणीव होवू लागते आणि उक्त कृतीतून आपणास मुक्ततेचा मार्ग सापडतो.

विचार म्हणजे मानसिक काळ होय. पूर्वीचे अनुभव आणि पूर्वी गोळा केलेली माहिती यातून विचारांचा जन्म होत असतो. म्हणून विचारांना भूतकाळ म्हणजेच काळापासून विलग करता येत नाही. काळ हा माणसाचा मानसिक शत्रू आहे. आपली कर्मे हि पूर्वज्ञानावर आधारित असतात आणि म्हणून ती कालबद्ध असतात, म्हणून माणूस हा नेहमी भूतकाळाचा गुलाम असतो. काळाला उदय, अस्त आदींच्या मर्यादा असतात आणि विचार हे कालबद्ध असतात म्हणून विचार सुद्धा नेहमी मर्यादित असतो आणि म्हणूनच त्यावरील आपले जीवन हे सतत संघर्षमय राहते. पुरातन आदिमानव जसे टोळीयुद्ध करून हत्या करायचा तसेच आधुनिक मानव बॉम्ब युद्ध करून आपल्याच मानव बांधवांची हत्या करीत असतो. म्हणजे मानवाची जशी शारीरिक उत्क्रांती झाली तशी मानवाची मानसिक उत्क्रांती झाली नाही. 

जेव्हा एखाद्या मनुष्याला स्वतःच्या विचारांच्या मायाजालाची जाणीव होते, तेव्हा तो विचार आणि विचार करणारा, निरीक्षण आणि निरीक्षण करणारा, अनुभव आणि अनुभव करणारा यांच्यातील फरक ओळखतो. जर का त्याच्या आकलनात आले की हा फरक एक भ्रम आहे, तर केवळ तेथे शुद्ध निरीक्षण घडले जाईल आणि अंतर्दृष्टी प्रकटेल जी भूतकाळातील किंवा काळाच्या सावली शिवायची अंतर्दृष्टी असेल. ही शाश्वत अंतर्दृष्टी मनामध्ये एक खोल, मूलगामी परिवर्तन घडवून आणते

विचारांनी ज्या ज्या संकल्पना बनविल्या आहेत त्या सर्वांचा त्याग करणे हे त्या अंतर्दृष्टिने शक्य होते आणि जेव्हा मनाने बनविलेल्या सर्व संकल्पना आपल्यातून नाहीशा होतात तेव्हाच खरे प्रेम, करुणा आणि सत्य ज्ञान आपणास स्पर्श करते जे सदैव सतत सर्वत्र विद्यमान असते. 

केवळ मुक्त झालेले मन सत्य शोधू शकते. मुक्त मन हे भूतकाळातील सर्व संकल्पना आणि कल्पनांपासून मुक्त झालेले असते. जो मनुष्य आपल्या सभोवतालची परिस्थिती बदलू शकत नाही, त्याने त्यामधून बाहेर पडायला हवे. बाहेर पडण्यासाठी प्रचंड उर्जेची आवश्यकता असते. असत्य जीवनशैली मधील फोलपणा लक्षात आल्याने जी ऊर्जा निर्माण होते ती ऊर्जा मदत करते.

जेव्हा मन सर्व संकल्पनातून रिकामे होते, निर्विकल्प होते, तेव्हा त्याला सत्याची ओळख होईल, सत्य म्हणजे शून्यता आहे. सत्याची कृती ही विवेक आणि करुणा आहे जी कोणत्याही विकृतीशिवाय कार्य करते."

https://jkrishnamurti.org/el/about-core-teachings

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मानसिक मृत्यू हाच सत्य साक्षात्कार करण्याचा एकमेव मार्ग आहे

मी कोण आहे?

जीवनाची जटीलता