राष्ट्रीयता आणि संघटित धर्म हे सत्य शोधातील अडथळे होत


सत्य समजण्यासाठी तुम्ही तुमच्या नेत्यांवर शंका घ्याल? सत्य शोधून काढण्यासाठी गोष्टीचा केवळ स्वीकार करण्याऐवजी तुम्ही त्यावर टीका करायला नको का, त्यासंबंधी प्रश्न, विचारणा करावयास नको का? टीका करण्याची तुमची हिंमत होईल? 


या प्रश्नात अधिकाराचा स्वीकार अंतर्भूत आहे; कोणीतरी तुम्हाला काहीतरी सांगते आणि तुम्ही ते लगेच मान्य करता. स्वीकारण्यामध्ये आंधळेपणा व बुद्धिमत्तेचा पूर्ण अभाव असतो, मग ते कोणीही का सांगितलेले असेना. विचारणा करण्याची, छडा लावण्याची टीकात्मक क्षमता जर तुम्ही गमावलेली असेल तर सत्य काय आहे हे तुम्हांला कधीही सापडणार नाही. 


हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे की, गोष्टी मान्य न करता आपण त्यासंबंधी विचारणा केली पाहिजे, त्यासंबंधीचे सत्य काय आहे ते शोधून काढले पाहिजे आणि सत्य काय आहे ते शोधण्यासाठी तुमच्याजवळ कोणत्याही गुरूचे अथवा राजकारणी व्यक्तीचे मार्गदर्शन नव्हे, तर एक खुले हृदय व मोकळे मन असले पाहिजे. 


संघटित धर्म म्हणजे सत्य शोधातील अडथळाच होय; कारण असे धर्म त्यांचे अंधविश्वास, हाताने किंवा मानसिक स्तरावर बनविलेल्या त्यांच्या प्रतिमा, त्यांचे निष्ठुर विधी, समारंभ आणि अशा अन्य गोष्टींद्वारा विचार व भावनांना संकुचित करून टाकतात. म्हणून धर्म म्हणजे विचारांनी तयार केलेल्या वास्तवाचा शोध होय, सत्याचा नव्हे. विधी, समारंभ, पवित्र ग्रंथांचे पारायण इत्यादी गोष्टी म्हणजे धर्म नव्हे. याचा अर्थ असा की, धर्म जेव्हा संघटित विश्वासाचे रूप घेतो तेव्हा तो धर्म राहत नाही. 


सत्यासंबंधीची विचारणा ही नकारात्मकच असली पाहिजे, होकारात्मक नव्हे; कारण होकारात्मक कृती ही नेहमी होकारात्मक शेवटाकडे घेऊन जाते जो तुमच्या माहितीतलाच असू शकतो. आणि वास्तव हे अज्ञेय असते. तुम्ही त्याची कल्पना अथवा त्याचे शब्दांकनही करू शकत नाही. ते अज्ञात असते. म्हणून अज्ञाताप्रत कोणत्याही होकारात्मक मार्गाने येणे म्हणजे अज्ञाताला ज्ञेय बनविणे होय आणि म्हणून मग ते सत्य राहत नाही. जेव्हा ज्ञाताचे अस्तित्व संपते, तेव्हाच सत्य असते. काळातून शाश्वताप्रत येता येत नाही. शाश्वत तेव्हाच असते जेव्हा काळ संपतो, जेव्हा विचाराचा, जो काळाचाच परिणाम आहे, अंत होतो. म्हणून धर्म म्हणजे काहीतरी होकारात्मक नव्हे; तो हटवादी, आग्रही किंवा मतांतर करविणारा नसतो; तो म्हणजे प्रतिमांचे पूजन नव्हे.


संघटित धर्माप्रमाणेच राष्ट्रवादाने देखील माणसामाणसांत फूट पाडली आहे. राष्ट्रवादातून तुम्हाला कधीही बंधुभाव सापडणार नाही. तुम्ही जर राष्ट्रवादी असाल, आणि बंधुभावाने राहण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही स्वतःची फसवणूक करत आहात कारण तुम्ही एकाशी संलग्न होऊन बाकीच्यांना नाकारू शकत नाही. ज्याक्षणी तुम्ही स्वतःला एखाद्या श्रद्धेशी किंवा देशाशी संलग्न करता त्याक्षणी तुम्ही युद्धाचे निर्माणकर्ते होता. तुम्ही भले ही बंधुभावासंबंधी बोलत असाल, परंतु तुम्ही दडपशाहीच्या अवस्थेत जगत असता. म्हणून तुम्ही युद्धाला कारणीभूत होता. राष्ट्रवाद आणि संघटित धर्म यात मला फारसा फरक आढळत नाही. या दोघांनीही माणसाला दुःख दिले आहे, माणसामाणसांत फूट पाडली आहे, विनाश व संघर्ष पसरविला आहे; कारण ते दोन्ही अंधविश्वास व देशभक्तीद्वारा माणसाला माणसापासून अलग करतात. 


खचितच, सत्य शोधण्यासाठी तुम्हांला हाताने किंवा मनाने निर्माण केलेल्या या क्षुद्र प्रतिमांच्या पलीकडे गेलेच पाहिजे, नाही का? वास्तवाचा शोध घेण्यासाठी तुम्ही राष्ट्रवादाची भावना संपवली पाहिजे मग ती कितीही चित्तथरारक असो, कितीही उत्तेजक असो; आणि कोणत्याही विशिष्ट धर्माशी संलग्न असणे पण तुम्हांला थांबवले पाहिजे, नाही का? राष्ट्रवाद आणि संघटित धर्म हे दोन्हीही विचाराने, काळाने लावलेले शोध असल्यामुळे, कालातीताच्या आकलनासाठी तुम्हांला काळापासून मुक्त असले पाहिजे. 


ज्या माणसाला सत्य शोधण्याची इच्छा आहे, त्याने या दोन्ही गोष्टी मागे टाकल्या पाहिजेत; कारण सत्य हे हाताने बनविलेल्या किंवा मनाने साकारलेल्या प्रतिमांमध्ये मिळत नसते: परंतु जेव्हा विचार संपतो आणि विचाराचा अंत हाच काळाचाही अंत असतो, तेव्हा सत्याचा शोध घेता येतो. केवळ आत्मज्ञानातूनच सत्याचे आकलन होऊ शकते, कोणत्याही पुढाऱ्याच्या आग्रही मतांना अनुसरण्याने नव्हे.


जे. कृष्णमूर्ती, चेन्नई, १४ डिसेंबर १९४७ के. एफ. आय. बुलेटिन क्रमांक १, १९९६, पृष्ठसंख्या १६-१९

(संवाद-७,२००४)





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मानसिक मृत्यू हाच सत्य साक्षात्कार करण्याचा एकमेव मार्ग आहे

मी कोण आहे?

जीवनाची जटीलता