वैचारिक हालचाल

आपण अतिशय मूलभूत गोष्टींचा विचार आज करणार आहोत. जर आपणास या विषयाचे आकलन झाले तर मला याचे खरेच आश्चर्य वाटेल. कारण हे खरोखर अतिशय गंभीर आणि तितकेच आवश्यक असे आहे.

आपल्या आशा आकांक्षा हेच आपल्या दुःखाचे कारण आहेत. आशा आकांक्षा निर्माण होण्यासाठी आणि त्याची पूर्तता करण्यासाठी आपणास विचार करावा लागतो. म्हणजे आपले विचार हे मूलभूत कारण असते आपल्या दुरवस्थेला. विचार करणारे आपले मन हे आपले वैयक्तिक मन नसते कारण समाजातील हजारो वर्षापासून प्रचलित असणाऱ्या श्रद्धा आणि परंपरा यांच्या माहिती पासून आपले मन तयार झालेले असते. याची निर्मिती पुरोहितांनी, तत्वज्ञान्यानी, सुशिक्षितानी ज्ञानाचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सतत वाढविला आहे. हे समजल्यानंतर आपण आपल्या विचारांना थांबविले पाहिजे असे वाटणे साहजिक आहे. परंतु महत्वाचा प्रश्न असा आहे की, आपण आपल्या विचारांना थांबवू शकतो का? आपणास कोणी तरी ती कला आत्मसात करण्यास प्रोत्साहित करते. मग आपण त्या प्रमाणे काहीतरी बनण्याचा किंवा काहीच न बनण्याचा निर्णय करतो. निर्णय घेणारे कोण असते? निर्णय आणि निर्णय घेणारा हे दोन्ही विचार आहेत, त्या अर्थाने ते समान आहेत. 

मानसिक रित्या आपण काहीतरी बनणे किंवा काहीच न बनणे या दोन्ही मनाच्या हालचाली आहेत आणि त्या सारख्याच असतात. काही तरी बनणे ही आशा म्हणजे विचारांची हालचाल असते. आणि मग आपण म्हणतो की, 'मला ते थांबविले पाहिजे आणि दुसरे काहीतरी बनले पाहिजे.' हि सुद्धा दुसऱ्या दिशेने विचार करण्याची हालचाल असते. बरोबर? मग ही विचाराची हालचाल आपण थांबवू शकतो काय?

यासाठी प्रथम आपण विचार करणे म्हणजे नेमके काय असते याचे उत्तर शोधूया. (ट्रेनच्या इंजिन चा आवाज येतो). विचारांनी बनविलेल्या ट्रेन मधून त्रासदायक आवाज येत आहे परंतु निसर्गतः बनलेल्या झऱ्याचा आवाज आपणास त्रास देत नाही. विचारांमुळे समाजात द्वेष दुही पसरते आणि त्यातून हिंसाचार आणि युद्धे होतात. विचारांमुळेच आपल्या नातेसंबंधात फूट पडते आणि ही फूट आपण एकमेकांच्या बनवलेल्या बऱ्या वाईट प्रतिमा मुळे पडत असते. या प्रतिमा बनण्यासाठी काल आवश्यक असतो. काळ हा अनुभवाद्वारे, घटनांद्वारे, संवादातून ज्ञान प्राप्त करण्याचा एक घटक असतो. जन्मल्या पासून आपण आपल्या पालक, जोडीदार, मित्र, नातेवाईक, सहकारी, नेते यांच्या ठराविक प्रतिमा तयार केलेल्या असतात. प्रत्येक प्रतिमा त्यांच्या चांगल्या वाईट अनुभवा प्रमाणे बनविताना काही ठराविक काळ गेलेला असतो. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची प्रतिमा आपला मेंदू तयार करीत असतो. तशाच प्रतिमा इतरांचे मेंदू सुद्धा तयार करीत असतात. सर्वांच्या वेगवेगळ्या मानसिक प्रतिमा मधील संघर्षातून कुटुंब, समाज यांच्यामध्ये विभाजन होत असते. ह्या सर्व प्रतिमा मेंदूमधील स्मृतीमध्ये साठविलेल्या असतात. मेंदूतील सर्व प्रतिमा हा आपला भूतकाळ असतो. स्मृतींची प्रतिक्रिया हाच आपला मी असतो, तो विचार मात्र असतो. या मीच्या विचारा मधून सामाजिक, धार्मिक, अध्यात्मिक प्रतीके तयार होत असतात. मेंदूतील स्मृती मधून निर्माण होणारी प्रतीके हि केवळ मानसिक भ्रामक प्रतीके असतात, त्यांचा प्रत्यक्ष जीवनाशी काही संबंध नसतो. भूतकाळातील प्रतिमा आणि प्रतीके आठवीत आपणास विचार स्फुरत असतात. धार्मिक प्रतीकांची आपण आराधना करीत असतो, त्यांच्या पासून आपण आपल्या जीवनाशी निगडित अनेक गोष्टींची अपेक्षा ठेवीत असतो. ती प्रतीके प्रत्यक्षात काहीच नसतात, ती सत्य सुद्धा नसतात.

आपले शरीर आणि त्यामधील मेंदू, मेंदूमधील पेशी हे सर्व भौतिक पदार्थाचे बनलेले असतात. परिणामी त्यामध्ये निर्माण होणारे विचार सुद्धा भौतिक स्वरूपाचे असतात. आपण अनुभवा द्वारे आत्मसात केलेले सर्व ज्ञान हे सुद्धा मेंदूतील स्मृती मध्ये साठविले जाते, ते ज्ञान सुद्धा भौतिक असते. 

मानव समाज या भौतिक मेंदू आणि त्यामधील भौतिक विचार आणि भौतिक ज्ञान या द्वारे भौतिक सृष्टीच्या पलीकडे काही अध्यात्मिक असे तत्व अस्तित्वात असावे असे गृहीत धरून असतो. विज्ञान सुद्धा बाहेरील विशाल अंतरालाचा अजस्त्र दुर्बिणी द्वारे त्याचाच शोध घेत आहेत. धार्मिक - अध्यात्मिक विचार असोत किंवा विज्ञान असो त्यांच्या भौतिक साधनांनी विश्वाचे मूळ असलेल्या परंतु भौतिक नसलेल्या अशा एखाद्या अज्ञात तत्वाचा शोध लागू शकेल काय? आणि जर पूर्वीच्या ऋषी मुनींनी त्याचा शोध लावला होता तर ते अजून अज्ञात का असावे? याचा अर्थ आपल्या लक्षात येतो काय?

अध्यात्मिक किंवा वैज्ञानिक हे दोघेही अतिशय दूर असलेल्या अज्ञात अशा विश्वाचे मूळ शोधत आहेत. यापेक्षा आपण आपल्या आत असणाऱ्या आपल्या मी चा शोध घेणे सहज शक्य आहे. जे काही आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील तथ्ये आहेत त्यांचा शोध घेणे आवश्यक असताना आपण अतिदुरच्या ईश्वराचा आणि अंतरालचा शोध का घेतो? मी ची चौकशी हे तथ्याचा आधार घेत आपण करू शकतो. मी चा साक्षात्कार झाला तर पुढील सत्य सहज उकलते. आणि हे कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवीन. त्यासाठी तुम्हाला माझ्या बरोबर चालावे लागेल. आपण एकत्रित सुसंवाद करीत ते आत्मसात करू शकतो.

जर आपल्या हे लक्षात आले असेल की, विचार हा भौतिक पदार्थ आहे आणि या विचारांनीच आपल्या जीवनात संपूर्ण मानसिक संरचना बांधली आहे. आपली भीती, चिंता, निराशा, उदासीनता, प्रेम भावना, रोमँटिक स्वप्ने, सुख दुःख हे सर्व काही फक्त विचार मात्र आहे. जे लोक श्रद्धाळू धार्मिक आहेत त्यांच्यासाठी हे मान्य करणे कठीण आहे कारण त्यांना संभ्रमित केले गेले आहे की त्यांच्यामध्ये काहीतरी आध्यात्मिक तत्व आहे - ते आत्मा, परमात्मा, ईश्वराचे अंश आहेत वगैरे वगैरे.

पण हे सर्व ज्ञान किंवा सर्व विचार हे केवळ भौतिक गोष्टी आहेत. त्यांनीच कल्पनेने चैतन्य निर्माण केले, त्या चैतन्याचे अनेक भाग, अनेक अवस्था बनविल्या. (हसतात) हिंदूंचे आत्मा, ब्रह्म, ईश्वर आणि इतर देवी देवता हे केवळ विचारांची काल्पनिक उतरंड आहे जी अजूनही विश्वा बाहेरील अज्ञात शक्तीची भीती कायम करण्याचा प्रयत्न आहे. अगदी तसेच इतर धर्मियांनी सुद्धा केले आहे.   

जर विचारांनी आपल्या मानवी जीवनामध्ये मानसिक संकल्पना तयार करून प्रचंड गोंधळ घातला आहे. *तर मग विचारांचे मानवी जीवनात स्थान का असावे?* प्रत्येक जीवाला आपले जीवन सुरक्षित आणि संवर्धित करण्यासाठी विचारांची आवश्यकता असते. केवळ आणि केवळ एवढ्याच कारणासाठी विचार जीवास आवश्यक असतात. विचारच नसतील तर सर्व जीव वेड्या प्रमाणे वागले असते. त्यांना स्वतःचे घर कोठे आहे, अन्न कोठे आहे, ते कसे मिळवायचे, आसरा निवारा कोठे बांधायचा, कसा बांधायचा इत्यादी गोष्टी कळल्या नसत्या. जीवन जगण्यासाठी केवळ जीवनावश्यक विचार आवश्यक असतात आणि काल्पनिक विचार अनावश्यक असतात. विचार करण्याचे जे जीवाचे कौशल्य आहे ते हवेच आहे. परंतु विचार हे जीवनातील तथ्ये, वास्तवाशी निगडित असावेत, वस्तुनिष्ठ असावेत, स्पष्ट असावेत, कार्यक्षम असावेत परंतु व्यक्तिगत स्वार्थी विचार नसावेत. इतर अनावश्यक स्वार्थी संकल्पनांना मानवी जीवनात स्थान नसावे. ज्यांना जे वास्तविक जीवन चालू असते त्या पेक्षा विना सायास सुखी, आनंदी जीवन हवे असते ते विचार मग मानसिक रचनांचे मनोरे तयार करत जाते.

तेव्हा विचारांच्या हालचाली शिवाय या जगात राहणे शक्य आहे का? आपणास माझा प्रश्न समजला का?

आपणास असे वाटत राहते की जर विचारांची मनोवैज्ञानिक रचना नसेल तर मानव समाज जास्त प्रगती करू शकणार नाही. असे वाटणे साहजिक आहे. कारण जोपर्यंत काहीतरी बनण्याची आशा आहे आणि त्यासाठीच्या कल्पना आहेत आणि त्यासाठीचे मनाचे केंद्र आहे तो पर्यंत ते होत राहते, मनाचे हे केंद्र हेच विचारांचे केंद्र आहे. आणि जे मन मानसिकतेने निर्मिलेल्या संरचनेपासून मुक्त नाही, ते मन शक्यतो आणखी पुढे जाऊ शकत नाही. ते मन अनेक युक्ती योजून भ्रमात जगते आणि भ्रमात मरते.

  - जिदु कृष्णमूर्ति, १९८० सानेन, स्वित्झर्लंड, व्याख्यान क्र २

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मानसिक मृत्यू हाच सत्य साक्षात्कार करण्याचा एकमेव मार्ग आहे

मी कोण आहे?

जीवनाची जटीलता