सुसंवाद मधून सत्य
दोन व्यक्ती एकमेकांस जरी ओळखत असल्या तरी त्यांच्यात सुसंवाद असतोच असे नाही. एकमेकांना सांभाळून घेताना सुसंवाद आवश्यक आहे. सुसंवाद तेव्हाच शक्य होतो जेव्हा सर्वजण एकाच वेळी एकाच पातळीवर असतात, एकमेकांविषयी आपुलकी असते.
मी धार्मिक, अध्यात्मिक, मानसशास्त्र अथवा वैज्ञानिक वाचन करीत नाही त्यामुळे मी त्यातील अवघड संकल्पना मांडीत बसत नाही. साध्या सोप्या शब्दात आपण संवाद केला तर समजणे सहज होते.
परंतु जर आपण ते लक्षपूर्वक ऐकले नाही तर ते सुद्धा समजणे अवघड होवू शकते. ऐकणे ही सुद्धा एक कला आहे. ऐकताना आपण आपले सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवायला हवेत. संपूर्ण लक्ष दिले तर ऐकणे सुलभ होते. परंतु ऐकताना जर आतून विरोध असेल, भीती असेल, आसक्ती असेल तर ते ऐकले जात नाही. किंवा आपणास आपल्या दैनंदिन जीवनात काही त्रास होत असेल तरी सुद्धा ऐकण्यावर लक्ष लागू शकत नाही. म्हणजे आपण जे ऐकत असतो ते आपलेच ऐकत असतो, समोरचे जे सांगणे असते ते आपल्या आतमध्ये उतरत नाही. त्यामुळे एकमेकांचे ऐकणे हे अतिशय अवघड होवून गेले आहे आणि ती आपल्या सर्वांची समस्या बनली आहे.
कदाचित माझ्या सांगण्यात येणारे जे काही असेल ते आपणास रुचत नसेल, आपल्या श्रद्धाच्या ते विरुद्ध असेल, आपला त्यास विरोध असेल, मी चुकीचे सांगत असेन किंवा आपण चुकीचे ग्रह बनविले असतील तरी सुद्धा कृपया ते लक्षपूर्वक ऐका. कारण आपण लक्षपूर्वक ऐकले आणि त्यावर चिंतन केले तर त्यामधून आपणास सत्य म्हणजे काय असते याचे कदाचित आकलन होवू शकते.
सत्य आपणास दुसरा कोणी देवू शकत नसतो. ते तुमचे तुम्हीच ओळखायचे असते फक्त ते ओळखण्यासाठी आपल्या मनाची अशी अवस्था असायला हवी की त्याच्यात ते आकलन करण्याची पात्रता असावी. ज्यावेळी मनात विरोध असतो, पूर्वग्रह असतात त्यावेळी मन आकलन करण्यास पात्र नसते.
आपण आत्ता जे काही करीत असतो तिकडे आपण लक्ष न देता भलत्याच गोष्टींचा सतत विचार करीत असतो. आत्ता जे काही होत आहे त्याची जाणीव असली तर ते समजणे शक्य होते. जे काही होत आहे ते आहे तसे समजून तेव्हाच घेतले जाते जर आपण त्यास विरोध करीत नसू किंवा त्याचे समर्थन करीत नसू किंवा त्यावर टीका करीत नसू किंवा त्याचा गैरअर्थ काढीत नसू. अशी ज्यावेळी मनाची अवस्था होते तेव्हा ते मन विवेकी बनते. जेव्हा आपण त्याचा गैरार्थ काढू, टीका टिप्पणी करू, विरोध करतो तेव्हा त्या वास्तवाचे सत्य समजणे शक्य होत नाही.
एखादे संशोधन करताना शास्त्रज्ञ ते जे काही आहे त्याचे फक्त अवलोकन करीत असतात. ते कसे असावे किंवा कसे नसावे असा ते अंदाज लावीत बसत नाहीत तसेच आपले आकलन असावे. जर आपण सर्वजण बघताना, ऐकताना, अवलोकन करताना अशी काळजी घेवू की जे जसे आहे ते तसेच त्याच्या फक्त जाणिवेत राहिलो तर सर्व प्रश्न सहज सुटू शकतात. सर्व संघर्ष समाप्त होवू शकतील. जर मी लबाड असेन आणि ते मी कबूल करीत असेन तर सर्व प्रश्न तिथेच निकालात निघतील. आपण जसे आहोत तशी त्याचे प्रत्येकानी कबुली देणे हाच विवेकाचा जन्म असतो, वास्तव परिस्थीती समजण्याची ती सुरुवात असते, त्यातूनच आपली काळाच्या बंधनातून मुक्तता शक्य होणार असते.
आपण आता यापुढील संवाद मध्ये आपण तेच करणार आहोत. आत्ता जे काही आहे ते तसेच मी आपल्या निदर्शनात आणून देत जाईन, त्याचे माझ्या पूर्वग्रह अनुसार मी अर्थ लावणार नाही, आपण सुद्धा आपल्या पूर्वज्ञाना नुसार ते जे आहे त्याचा अर्थ लावीत बसू नये.
J Krishnamurti,
Introduction,
फर्स्ट अँड लास्ट फ्रीडम

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा