आपण दुःख संपूर्ण संपवू शकतो काय?
आपण नैराश्य आणि दुःख यांच्या सतत चालू असणाऱ्या मालिके मधून स्वतःस वाचवू शकतो काय? पूर्वी बुद्ध, ख्रिस्त आणि त्यांच्या सारखे अनेक महामानव होवून गेले होते. असे सांगितले जाते की त्यांनी त्यांचे स्वतःचे दुःख संपविले होते. परंतु त्यांनी जगातून दुःख आणि नैराश्य यांना हद्दपार केले नाही. अजूनही दुःख आणि नैराश्य यांनी मानव समाज त्रस्त आहे. आपण काही क्षणात सर्व दुःखापासून मुक्त होऊ शकतो काय?
एखादा नदी प्रवाह आहे आणि त्यामध्ये दुःख आणि नैराश्य आहे. आपणा कडे त्या नदी प्रवाहातून बाहेर उडी मारण्याचे स्वातंत्र्य असते. तसेच समाजामध्ये राहून जर आपण त्या समाजाचे भाग बनण्याचे नाकारले तर आपण स्वतः आणि आपल्या सारख्या इतरांना दुःख मुक्त करू शकतो, आत्ता या क्षणी.
आपणास जसे दुःख आणि नैराश्य याची जाणीव होते तशीच ती इतरांना सुद्धा होत असते. हि जाणीव नेहमी वर्तमानात होत असते त्यामुळे वर्तमानात कृती करणे अत्यावश्यक असते. आपण जर नंतर बघू म्हटले तर तोपर्यंत दुःखाचा एखादा डोंगर कोसळून सर्व काही संपून जाते. म्हणून जेव्हा दुःखाची जाणीव होते म्हणजे त्या सत्य परिस्थितीची जाणीव होते त्याच क्षणी कृती आवश्यक असते दुःख आणि नैराश्य मधून बाहेर येण्यासाठी. ते तसे करणे शक्य असते आणि तसे करायला सुद्धा हवे परंतु श्रद्धा मुळे आपण अशा अनेक उर्मी वाया घालवीत असतो. खरी मानवी क्रांती हीच असते. दुसऱ्या राजकीय क्रांत्या फक्त एक हुकूमशहा बदलून दुसरा आणीत असतात. प्रत्येक व्यक्तीने त्याचे इतर व्यक्तींशी असणाऱ्या नाते संबंध बाबत जागरूक असणे हीच खरी क्रांती असते.
समाज हा आपल्या प्रत्येकाच्या आतील स्वभावाचे बाह्य प्रतिबिंब असते. जर समाजातील सर्वांनी स्वतःचे अंतरंग नीट ओळखले नसेल तर बाहेर सगळा गोंधळ निर्माण होत राहतो. आपण आपल्या प्रत्येक व्यक्तींमधील नाती जर नीट तपासली नाहीत तर समाजात सौहार्द निर्माण होत नाही.
समाजामधील मी एक घटक आहे, आणि जर मी मला ओळखत नसेन आणि मी माझे इतरांबरोबर असणारे संबंध तपासत नसेन तर समाजात विषमता राहणार आणि त्यामधून संघर्ष होत राहतात. समाज स्वतःला बदलू शकत नाही जोपर्यंत समाजातील माझ्या सारखे इतर घटक स्वतः बदलत नाहीत. समाजातील विषमता, संघर्ष, अराजक, दुःख, नैराश्य, क्रूरता हे आपल्या सारख्यानी बनविले आहे, आपण त्यास जबाबदार असतो. म्हणून समाज काही तरी करेल याची अपेक्षा न ठेवता आपण आपल्या स्वतःमध्ये क्रांती करणे आवश्यक आहे.
मी मला ओळखायला हवे आणि ते आत्ताच ओळखायला हवे ते उद्यावर ढकलून चालत नसते. कारण तो पर्यंत दुःख आणि नैराश्य तो पर्यंत चालूच राहील. उद्या करतो असे म्हणताच काळ येतो आणि काळ हाच आपल्या दुखास कारणीभूत असतो. सत्य स्थितीचे आकलन हे आत्ताच्या क्षणात असते.
जर आपणास आपल्या जीवनात आणि समाजात परिवर्तन, क्रांती आणावयाची असेल तर ते या क्षणीच शक्य असते, तत्क्षणी होत असते नंतर ते अशक्य असते.
ज्याच्या जीवनात असे परिवर्तन होते त्या व्यक्तीच्या जीवनात दुःखाचा लवलेश मात्र रहात नाही. त्याचा मी त्याच्या अस्तित्वाबद्दल साशंक रहात नाही. अशी व्यक्ती विनाशाच्या सुनामी पासून स्वतंत्र झालेली असते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा