व्यक्ती आणि समाज


व्यक्ती हि समाजाच्या हातचे बाहुले आहे की व्यक्तीच्या उन्नतीसाठी समाज आहे? हा एक नक्कीच खूप महत्वाचा विषय आहे. 


आपण समाजाचे, सरकारी यंत्रणांचे, धार्मिक समूहाचे प्यादे असावे काय? त्यांनी त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी आपला हवा तसा उपयोग करून घ्यावा काय? की प्रत्येक व्यक्तीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांनी सहाय्यभूत असावे?


जर व्यक्ती पेक्षा समाज महत्वाचा असेल तर प्रत्येक व्यक्तीने त्याचा स्वतःचा विचार करणे सोडून द्यावे लागेल आणि फक्त समाज, सरकार, धार्मिक संघटना यांच्यासाठी गुलामा सारखे सतत काम करीत राहावे लागेल. एखादी व्यक्ती त्या संस्थेच्या उपयोगाची असेल तर ठेवली जाईल आणि नसेल तर काढली जाईल किंवा व्यक्तीचा व्यापार केला जाईल. परंतु जर समाज हा व्यक्तीच्या भल्यासाठी असेल तर व्यक्तीला सामाजिक बंधनातून मुक्त ठेवावे लागेल, त्याला संपूर्ण स्वातंत्र्य द्यावे लागेल. या दोन व्यवस्थे मधील काय योग्य आहे किंवा काय अयोग्य आहे याचा आपण सखोल विचार करायला हवा.


या विषयाच्या खोलात जाण्यासाठी आपण पूर्वीच्या मतांचा, ज्ञानाचा, ग्रंथांचा, गुरूंचा आधार घेणे योग्य होणार नाही. कारण त्यामुळे आपला शोध हा पूर्वग्रह दूषित होण्याची शक्यता आहे. तो शोध काहींच्या श्रद्धाच्या बाजूचा असेल किंवा काहींच्या श्रद्धा विरुद्ध असू शकेल. पुराण मत, तत्वे, विचार हे कदाचित पोकळ कल्पना असू शकतात त्या पेक्षा जीवनातील तथ्य हे नाकारता येत नाही. जर आपण एखाद्या गोष्टीचे सत्य शोधू शकलो तर आपणास त्याविषयी मत बनविण्याचे प्रयोजन उरणार नाही. त्यामुळे पूर्वीच्या बुद्ध, जीजस किंवा शंकराचार्य या सारख्यानी काय मत व्यक्त केले आहे याचा आपण आत्ताची समस्या सोडविण्यासाठी विचार करायचा नसतो. कदाचित त्या काळात त्यांनी त्यांची मते त्या काळातील श्रद्धाच्या आहारी जावून घेतली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


सत्य ज्ञान हे कोणाच्या आधाराशिवाय असायला हवे, ज्याला इतरांच्या मतांचा टेकू लागतो ते सत्य असू शकत नाही. 


सत्य शोधण्यासाठी प्रथम आपणास सर्व प्रकारच्या अपप्रचार यंत्रणा पासून दूर राहावे लागेल. याचा अर्थ या प्रश्नाकडे पाहण्यासाठी आपण पूर्णपणे सर्व मता पासून अलिप्त असायला हवे, कोणत्याही नेत्याच्या प्रभावा पासून मुक्त असायला हवे. जेव्हा आपण गोंधळलेले असतो तेव्हा आपण इतरांचे सहाय्य घेतो. आपण निवडलेला नेता सुद्धा असाच गोंधळलेला असतो, आणि सर्व जगभर हे असेच चाललेले आहे. 


एखादी समस्या हाताळणाऱ्या मनाला त्या समस्येची पूर्ण जाण असणे जसे अगत्याचे असते तसेच ती समस्या तितकीच गंभीर पणे हाताळणे महत्वाचे असते. प्रत्येक समस्या ही नवीन असते म्हणून ती नवीन समस्या हाताळणारे मन सुद्धा ताजे असावे लागते, ते मन हे पुरातन संस्कारात अडकलेले नसावे. यावरून आपल्या लक्षात हे आले असेल की समाजातील बाहेरच्या समस्या हाताळण्यासाठी प्रथम आपल्या आतमध्ये परिवर्तन होणे अगत्याचे आहे. आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये जे परिवर्तन होईल त्यामधून बाहेरच्या समस्या आपोआप सुटल्या जातील. समाजातील अनेक तज्ञांना समाजात परिवर्तन करण्याची आवश्यकता भासत असते परंतु ते सर्व आतमध्ये न डोकावता बाहेर क्रांती करण्याचा प्रयत्न करत असतात. जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती श्रद्धा आणि परंपरा यांच्या अज्ञानातून बाहेर येवून जीवनातील तथ्यांचा मागोसा घेत नाही तो पर्यंत काही आशा नाही.


जे कृष्णमुर्ती, 

Book: First and Last Freedom

Chapter: III Individual and Society


सामाजिक बंधनात घट्ट अडकलेली व्यक्ती स्वतःचा विकास करीत नाही आणि व्यक्तीच्या विकासा अभावी समाजाचा विकास होत नाही. 






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मानसिक मृत्यू हाच सत्य साक्षात्कार करण्याचा एकमेव मार्ग आहे

मी कोण आहे?

जीवनाची जटीलता