सामाजिक क्रांती की वैयक्तिक मन परिवर्तन

 


समाज म्हणजे काय असतो? आपले एकमेकांशी असलेले नाते संबंध म्हणजे समाज असतो. आपले सर्वांचे जर आतून परिवर्तन झालेच नसेल तर समाजाचे सुद्धा परिवर्तन होणे शक्य नसते. आणि यामुळेच हजारो वर्षे त्याच त्या परंपरा फक्त नवीन प्रकारात समाजात येत राहतात. सामाजिक मूल्ये तीच राहतात, समाज जिथल्या तिथेच राहतो. नाविण्यास मज्जाव केल्याने समाजात जिवंतपणा रहात नाही. समाजातील या जुन्या परंपरा घालविणे अत्यावश्यक ठरते. 

समाजातील गोंधळ, दुःख, नैराश्य, दारिद्र्य कोठून येते? ते कोणी व्यापारी, राजकारणी, पुजारी, नास्तिक लोक तयार करतात काय? आपणच ते तयार करीत असतो. ते आपल्या एकमेकांच्या नात्या मधून येत असते. आपल्या घरातील कलह, भाऊबंदकी बाहेरून येते की आपणच त्यास जबाबदार असतो. आणि आपले हे कलह घेवून आपण ते बाहेरच्या समाजात देत असतो. आणि आपल्या प्रत्येकाच्या नात्यांमधील कलह हाच समाजातील गोंधळाची परिस्थिती निर्माण करीत असतो. आपले एकमेकांचे जे संबंध असतात त्यातूनच तर समाज बनत असतो. आणि आपल्यामध्ये जर अहंकार, संकुचित वृत्ती, गोंधळ असेल तर तेच समाजात पसरते आणि त्यातूनच समाजात अराजक माजते. 

आपण प्रत्येकजण या समाजाचे घटक आहोत म्हणजे आपल्या समस्या ह्या समाजाच्या समस्या बनतात. समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी आपण मोठमोठ्या योजना बनवितो. त्यापेक्षा जर प्रत्येकाने आपल्या स्वतःपासून सुरुवात केली म्हणजे जे आपल्या आवाक्यात आहे आणि जवळ आहे तर आपण आपले दैनंदिन जीवनशैली सुधारू शकतो, आपले परस्पर संबंध सुधारू शकतो. 

मानवी मन हे त्याचा स्वार्थ साधण्यासाठी इतरांचा द्वेष, तिरस्कार करीत असते. त्यामुळे समाजात विद्वेष पसरत राहतो. मन ज्या कल्पना बनविते त्यामध्ये स्वार्थ असतो, त्यामध्ये दुहीची बीजे असतात. मनाने ईश्वराची, धर्माची, देशांची संकल्पना बनविल्या आहेत. एका देवाचे भक्त दुसऱ्या देवाच्या भक्ताची हत्या करतात तेच धर्म आणि देश याबाबतीत होत आहे. म्हणून जे देश आणि धर्म विशाल बनलेले आहेत त्यांचा पाया हिंसेवर आधारित आहे. त्यांच्या पासून आपण मानवी जीवन सुव्यवस्थित होईल याची आशा ठेवणेच गैर आहे. 

वैयक्तिक रित्या आपण स्वतःची जीवनशैली सुव्यवस्थित करू शकतो. वैयक्तिक मानसिक परिवर्तन मधूनच सामाजिक परिवर्तन शक्य आहे. बाहेरून केलेली सामाजिक क्रांती प्रत्येक माणसाच्या आतमध्ये पोहोचली नाही तर ती व्यर्थ जाते. कितीही चांगले नियम आणि कायदे केले तरी समाजातील अपराध कमी होत नाहीत कारण व्यक्तींमधली मानसिक परिवर्तन झालेले नसते. सामाजिक परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चाललेली आहे, सामाजिक मूल्ये ढासळत आहेत. समाज बदलण्यासाठी व्यक्तीमध्ये मानसिक परिवर्तन होणे आवश्यक आहे हे सांगण्यासाठी कोणा तज्ज्ञाची आवश्यकता नाही, हे आपल्या मानवी जीवनाचे तथ्य आहे. 

जे कृष्णमुर्ती, 

Book: First and Last Freedom

Chapter: III Individual and Society





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मानसिक मृत्यू हाच सत्य साक्षात्कार करण्याचा एकमेव मार्ग आहे

मी कोण आहे?

जीवनाची जटीलता