आपण काय शोधत आहोत?
या अस्थिर जगात आपण काय शोधीत असतो? आपणास काय हवे असते? प्रत्येकजण सुख, शांती, आनंद यांचा आश्रय शोधत असतात. यासाठी आपण धर्म, देश बदलत राहतो, गुरु बदलत राहतो, नेता बदलित राहतो.
आपण सुख, आनंद शोधत असतो की समाधान शोधत असतो? समाधानाने जीवन जगताना सुख लाभत असतेच आणि परिपूर्णतेचा आनंद सुद्धा प्राप्त होतो.
आपणास नेमके काय हवे हे जर आपल्या लक्षात आले तर आपण त्याचा शोध घेवून त्याच्या समाधानात जीवन व्यतीत करू शकतो. ते जे काही आपणास हवे आहे ते आपले आपण शोधू शकतो की त्यासाठी एखाद्या गुरूकडे जावे लागेल किंवा एखाद्या मंदिरात जावे लागेल किंवा काही धर्मग्रंथ वाचावा लागेल?
आपल्या आयुष्यातील दुःख, कमतरता, नैराश्य याचे कारण शोधण्यासाठी आपणास बाहेरची मदत घ्यावी लागते. आणि ते आपण सर्वजण करीत राहतो. त्यासाठी भरपूर अभ्यास करतो, अनेक संप्रदाय मध्ये सेवा चाकरी करतो, अनेक गुरूंना शरण जातो. प्रत्येक वेळा आपणास असे वाटत राहते की होय, आपणास जे हवे ते मिळाले आहे. परंतु नंतर काही दिवसाने परत ती अतृप्तता सुरू होते आणि परत शोध सुरू होतो.
सततच्या बदलाने कंटाळलेले जीव मग कायम, अंतिम, वास्तविक सुख, समाधान, सत्य इत्यादींच्या मागे लागतात. आपण स्वतः अपूर्ण असतो म्हणून मग संपूर्ण सत्याच्या शोधात आपण आपले सर्वस्व वाहून देतो. परंतु ते जे काही पूर्ण सत्य आहे त्याचा पत्ता माहीत नसतो, त्या बद्दल काहीही माहिती नसते, त्याचा अनुभव नसतो. आपणास असे ज्ञान, अनुभव हवा असतो ज्यातून त्या अंतिम सत्याचे दर्शन होवू शकेल, त्यासमान होता येईल.
ज्यावेळी आपण अंतिम सत्य किंवा ब्रम्ह अवस्था किंवा ईश्वरीय आनंद किंवा चैतन्यमय अवस्था शोधत असतो त्यावेळी आपल्या हे लक्षात येते का की शोधणारा संशोधक नेमका कोण आहे? तो आपले शरीर आहे की मन आहे की आणखी तीसरेच कोणी आहे?
लक्षात आले काय की जे काही अंतिम सत्य अवस्था आहे तिचा अनुभव नाही आणि जो शोधणारा आहे त्याचा सुद्धा पत्ता नाही. दोन्ही वेगवेगळे आहेत की दोन्ही एकच आहेत या बद्दल सुद्धा माहिती नाही. अशा परिस्थिती मध्ये अंतिम अवस्थेचा शोध घेण्यापूर्वी ते शोधणारे जे तत्व आहे त्याचा पत्ता लागणे महत्वाचे आहे.
आता इथे जरा गंभीर होवून विचार करा की जर आपणास आपला स्वतःचा खरा पत्ता माहीत नाही तर त्या अज्ञाताला कोणी बाहेरील संत, महात्मा जरी असला तरी ते जे काही अंतिम सत्य आहे ते दुसरा कोणी देवू शकेल काय? जो पर्यंत आपण स्वतःस पूर्णपणे ओळखत नाही तो पर्यंत बाहेरील कोणी आपणास मदत करू शकणार नाही आणि आपला स्वतःचा अंतिम सत्याचा किंवा परम आनंदाचा शोध पूर्ण होवू शकणार नाही.
जोपर्यंत आपण स्वतःस योग्य रीतीने ओळखू शकणार नाही तो पर्यंत बाहेरील गुरु, संप्रदाय, त्यांचे ग्रंथ आपणास इतर कोणीही मदत करू शकणार नाहीत. ते मदत कोणास करणार?
स्वतःचा साक्षात्कार असणे, आत्मसाक्षात्कार असणे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, तेच अत्यंत अगत्याचे आहे.
जे कृष्णमुर्ती,
Book: First and Last Freedom
Chapter: II What are we seeking?

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा