आपण बळीचे बकरे झालो आहोत काय?

 


जीवनाचे सत्य समजण्यासाठी जीवन हे गांभीर्याने घ्यावे लागते. केवळ बघ्याची भूमिका घेत जीवन जगणाऱ्या व्यक्तींना जीवनाचे सत्य समजेल असे नाही. 


मी किंवा इतर कोणी आपणास मार्गदर्शन करू शकत नाही. प्रत्येकाचे जीवन वेगळे असते, त्याचे त्यालाच ते पार पाडायचे असते. वरवरच्या बघ्यांची भूमिका न घेता गांभीर्यपूर्वक प्रत्यक्ष जीवनाच्या खेळात भाग घेत जीवन जगता यायला हवे. काही लोक त्यांच्या वरील दुःखद प्रसंगांचे फायदा तोट्या मध्ये रूपांतरण करतात, अशांना त्याचे गांभीर्य कळणार नाही आणि सत्यही समजणार नाही. असे लोक दुःख, दारिद्र्य, अस्थिरता निवारण्यासाठी प्रयत्नशील नसतात.


समाजात अस्थिरता अधिक असेल तर दुःख सुद्धा अधिक असते, त्यासाठी सुरक्षेची भावना अधिक प्रबळ होत जाते. सुरक्षेसाठी मनुष्य देवळात जाईल, प्रार्थना करेल, संपत्तीचा हव्यास धरेल, नेते मंडळींचा आधार शोधेल. यामुळे जगात सतत नवीन गुरु, त्यांचे ग्रंथ, त्यांचे पंथ, संप्रदाय, संघटना, पक्ष निर्माण होत असतात. कारण समाजातील अस्थिरता त्यांना नवनवीन बकरे सतत पुरवीत राहते. अस्थिर समाजातील व्यक्ती सुरक्षेसाठी इतरांनी त्यांच्या फायद्यासाठी बनविलेल्या श्रद्धाच्या व्यवसायाची बळी ठरते. हेच सर्व जगभर सर्व समाजात चाललेले आहे. आणि हजारो वर्षांच्या सवयीने आता तेच सामान्य जीवन झाले आहे. 


बाहेरील संप्रदाय हे मानवी समस्यांवर उपाय योजना तयार करतात. नंतर ते उपाय आणि ते संप्रदाय, त्यांचे गुरु हेच महत्त्वाचे बनतात आणि त्यांच्या समोर सामान्य माणूस नगण्य होतो. धार्मिक संप्रदाय असोत अथवा सामाजिक, राजकीय संघटना असोत, प्रकार तोच असतो. सामान्य माणूस बाजूला राहतो आणि त्याच्या साठी बनलेले सरकार, अधिकारी, पुढारी, गुरु, संप्रदाय, पक्ष हेच त्याचे मालक बनतात. नंतर या मालक लोकांसाठी युद्ध, दंगे, अपप्रचार यंत्रणा यामध्ये सामान्य माणसांचे बळी दिले जातात. सामान्य माणसांनी मारण्यासाठी आणि मरण्यासाठी तयार होण्यासाठी त्यांना देव, देश, धर्म यांच्या अफूच्या गोळ्या दिल्या जातात. गावोगावी गल्लीबोळात या सर्वांचे जाळे पसरले आहे, कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्या श्रद्धेच्या जाळ्यात सर्वजण फसतात. 


हे केवळ माझे मत नाही, आपण स्वतः डोळे उघडे ठेवून पहा, आपणास त्याची प्रचिती येईल. यंत्रणा प्रमुख झाली आहे आणि माणूस नगण्य झाला आहे. हि यंत्रणा ज्यांच्या हातात आहेत ते धार्मिक, सामाजिक, राजकीय नेते समाजाचे प्रमुख अधिकारी झाले आहेत. त्यांच्याकडे आपण सत्ता दिली आहे, आपल्यावर अधिकार गाजविण्याची आणि म्हणून ते आपला बळी देत राहतात. 


जे कृष्णमुर्ती, 

Book: First and Last Freedom

Chapter: Introduction






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मानसिक मृत्यू हाच सत्य साक्षात्कार करण्याचा एकमेव मार्ग आहे

मी कोण आहे?

जीवनाची जटीलता