मानवी समस्या आणि पळवाटा


 Chapter IV

Self knowledge


मानवी समस्या इतक्या गुंतागुंतीच्या आहेत की, त्यांना समजून घेण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांच्याकडे अगदी सोप्या आणि थेट पद्धतीने संपर्क साधणे आवश्यक आहे. काल्पनिक उपायांनी वेळकाढूपणा करीत राहिल्याने समस्या अधिक खोलवर पसरत राहतात.


चर्चा, चिंतने किंवा जुन्या ऐवजी नवीन गुरूंच्या बदलीद्वारे उपाय शोधला जाऊ शकत नाही. कारण, मानवी मानसिक समस्यांचे निराकरण स्पष्टपणे त्या समस्येच्या निर्मात्या मध्ये आहे, गैरसमज हा निर्माण कर्त्यामध्ये आहे. मानवांमध्ये अस्तित्वात असलेल्या प्रचंड द्वेष आणि गैरसमजांमुळे, या गैरसमजाचा निर्माता, या समस्यांचे निर्माते, आपण, आपण आणि केवळ आपण आहोत. आपण विचार करतो की इतरजन याचा निर्माता असावा परंतु आपण सर्वजण वैयक्तिकरीत्या त्यास जबाबदार आहोत. जग म्हणजे तुम्ही आम्ही आणि आपले हितसंबंध हेच असते.


आपणच जागतिक समस्या बाबत जबाबदार आहोत. जग हे आपल्या विचारांचे बनलेले आहे आणि जगाला समजण्यासाठी आपण आपणास व्यवस्थित समजून घ्यायला हवे.  जग हे आपणा हून वेगळे नाही आपले गुण, दोष, समस्या हेच जगाचे गुण, दोष, समस्या असतात. जगातील समस्या सोडविण्यासाठी जागतिक संघटना आणि जागतिक नेते मंडळी आहेत, आपणास काय त्याचे? कृपया असा गैरसमज करून घेवू नये. जगातील युद्धे असोत, दंगे असोत, रोगराई असो, उपासमार असो त्या सर्वांस आपण वैयक्तिकरित्या जबाबदार असतो. म्हणून जगाला सुधारण्यापूर्वी स्वतःस सुधारणे अगत्याचे असते. स्वतः मध्ये सुधारणा करणे हे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपल्या मधील झालेली सुधारणा आपल्या इतरांशी असलेल्या संबंधातून जगभर पसरत असते. 


आपणा मध्ये सुधारणा करण्यासाठी जशी चांगल्या हेतूची आवश्यकता असते तसेच आपणास आपली खरी ओळख असणे तितकेच आवश्यक असते. स्वतःची खरी ओळख झाली की विवेक जागृत होतो आणि तेव्हाच परिवर्तन, सुधारणा शक्य होते. यासाठी तळमळ, जिज्ञासा असावी लागते. उगाच स्वतःचा स्वरूप साक्षात्कार कोण आणि कशासाठी करायला जाईल? आणि इथेच आपली खरी अडचण असते. बहुतेक जण त्यांच्या जीवनात असमाधानी असतात. पैसे, जायदाद यांची सोय झाली की ते समाधानी होतील असा त्यांचा समज असतो. असमाधानी व्यक्ती मध्ये ती ज्वाला नसते जी संपूर्ण अस्तित्वाचा शोध घेवू शकेल. जीवनात समाधान प्राप्त झालेली व्यक्तीच स्वतःची खरी ओळख करून घेवू शकते. ती ओळख इतर कोणी आपणास देवू शकत नाही किंवा ग्रंथ वाचून त्याचे आकलन होत नाही. ते आपले आपण शोधायचे असते आणि त्यासाठी ज्वलंत जिज्ञासा, तळमळ असावी लागते. जोपर्यंत हि जिज्ञासा निर्माण होत नाही किंवा ती अतिशय क्षीण असते तो पर्यंत आपली खरी ओळख आपणास मिळत नाही. 


स्वतःची ओळख ही खरी, वास्तविक, सत्य असायला हवी, ती इतरांनी सांगितलेली कल्पना नसावी, आभास नसावी. खरी ओळख जाणण्यासाठी जे जाणणारे असते ते मन सुद्धा अतिशय ताजेतवाने असायला हवे. जे सत्य आहे ते सतत नित्य नूतन होत असते त्याच्याशी ताळमेळ ठेवण्यासाठी आपले मन सुद्धा जुनाट, पुरातन परंपरा आणि त्यांच्या श्रद्धा मध्ये अडकलेले चालत नाही. पारंपरिक श्रद्धा पासून मन स्वतंत्र असावे लागते. आपली खरी ओळख प्राप्त करण्यासाठी केवळ कल्पना करणे योग्य ठरणार नाही आणि जे आपण नाही ते आपण आहोत अशी श्रद्धा असणे सुद्धा गैर आहे. आपण जे काही आहोत ते आहे तसेच स्वीकारण्याची आपली तयारी असली पाहिजे. 


हिंसा हे वास्तव असते तर त्या विरुद्ध अहिंसक होणे ही केवळ कल्पना असते. आपण रागावतो हे वास्तव असते आणि त्या विरुद्ध शांत राहण्याचा संकल्प करणे ही केवळ कल्पना असते. तसेच लोभ, इर्षा हे वास्तव असते आणि त्या विरुद्ध काही आदर्श बनणे हे केवळ मनातील मांडे खाणे असते.


आपण जर क्रोधी असू, हिंसक असू अथवा लोभी असू किंवा आपणा मध्ये इर्षा असेल तर जे सत्य आहे ते आपण प्रामाणिकपणे स्वीकारावयास हवे. त्या ऐवजी केवळ काल्पनिक आदर्शवाद स्वीकारणे हे वास्तवापासून केलेली पळवाट असते. पळवाट शोधली तर जे वास्तविक आहे त्यावर कृती करण्यापासून आपण वंचित राहतो. आपण योग्य असू अथवा अयोग्य असू परंतु जे आहे त्याचे योग्य मूल्यमापन करणे आवश्यक असते. 



जे कृष्णमुर्ती, 

Book: First and Last Freedom

Chapter: IV Self Knowledge




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मानसिक मृत्यू हाच सत्य साक्षात्कार करण्याचा एकमेव मार्ग आहे

मी कोण आहे?

जीवनाची जटीलता