सत्याचा उलगडा
जे कृष्णमूर्ती आणि डॉ डेव्हिड बोहम या आधुनिक कृष्णार्जून यांच्या सुसंवाद मधून सत्य अलगद उघड झाले आहे, ज्याला याचे आकलन होईल त्याला जीवनाचे सत्य समजु शकेल.
निसर्ग, माणूस, संपूर्ण विश्व हे जिथून उगम पावले आहे तो मूळ स्रोत, मुळ आधार काय आणि कसा असेल?
त्याला काळाचे बंधन नसेल, ते स्वतःच स्वयंपूर्ण असेल, त्याच्या पलीकडे आणखी काही नसेल. त्याला मानवी विचार किंवा मानवी मन हे कधीच स्पर्श करू शकणार नाही.
विश्व हे सुव्यवस्थित आहे. 'कॉसमॉस' या शब्दाचा अर्थ सुव्यवस्था असा होतो. निसर्ग सुव्यवस्थित आहे. जोपर्यंत माणूस त्यात ढवळाढवळ करत नाही तोपर्यंत निसर्गाची स्वतःची सुव्यवस्था असते.
(माणूस हा सुद्धा निसर्गाचाच एक भाग आहे, निसर्गाच्या सुव्यवस्थेचा तो सुद्धा भाग आहे, पण मानवी मना ने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीत अव्यवस्था निर्माण झाली आहे).
आपण आपल्या स्वतःमध्ये व्यवस्थित निरीक्षण करून, स्वअभ्यासाने, स्वतपासणीने, आपल्यातील अव्यवस्थेचे स्वरूप समजून घेऊ शकतो आणि अगदी त्याच्या अंतर्दृष्टीमुळे ती अव्यवस्था दूर होते.
अत्यंत हुशार आणि ज्ञानी आणि निष्पक्ष, सुसंस्कृत असा मनुष्य, सखोल शोध आणि तपासणी करून, स्वतःमध्ये सुव्यवस्था आणू शकतो, तो त्या सत्याच्या अंतिम टप्प्यावर येऊ शकतो.
पण आपण अनागोंदीत जीवन जगत असल्यामुळे, जीवनात सुव्यवस्था आणणे हे एक फार मोठे आव्हान झाले आहे परंतु स्वतः सुव्यवस्था तशी आव्हानात्मक नाही. आपण भूतकाळाशी किंवा आपल्या सवयींशी आणि आपल्या वृत्तींशी इतके बांधील झाले आहोत की, त्यातून बाहेर पडण्याची उर्जा, धैर्य, चैतन्य आपल्याकडे नाही. या सर्व गोष्टींबद्दल अंतर्दृष्टी येणे आवश्यक आहे. अंतर्दृष्टी हि पूर्व स्मृतीतून येत नाही, ती स्मृतीची हालचाल नाही, ती पारंपरिक शास्त्रामधून येत नाही, ती कोणत्याही आध्यात्मिक अनुभवातून येत नाही, ती त्या सर्व धार्मिक आणि अध्यात्मिक हालचालींपासून पूर्णपणे वेगळी आहे.
एखाद्या श्रद्धा स्थानाशी, एखाद्या व्यक्तीशी, एखाद्या कल्पनेशी, एखाद्या सवयीशी, एखाद्या अनुभवाशी बांधले गेल्या मुळे अपरिहार्यपणे जीवनात अव्यवस्था निर्माण होत असते. कारण इतरांशी बांधले जाणे म्हणजे परावलंबित्व होय. स्वतःच्या एकटेपणाच्या भीती पासून सुटका करून घेण्यासाठी समाज आणि कुटुंबीयांचे परावलंबित्व स्वीकारले जाते. या बाह्य आसक्ती बद्दल संपूर्ण अंतर्दृष्टी आली तर तीच अंतर्दृष्टी सर्व बाह्य असक्तींना दूर करते. पण आपली आसक्ती इतकी मजबूत झाली आहे की, आम्ही ती सोडायला तयार नसतो उलट अधिकाधिक आसक्ती स्वीकारीत असतो. आणि जोपर्यंत या सर्व अव्यवस्थेचे, विकाराचे मुळ असलेले ‘ मी ‘ नावाचे केंद्र भक्कम आहे, ते जोपर्यंत विसर्जित होत नाही तोपर्यंत जीवनात सुव्यवस्था येणे शक्य नाही.
मानवी मन म्हणजे जाणीव होय, जाणीव म्हणजे मी आणि माझे हितसंबंध यांची सामग्री होय. जाणीव आणि तिची सामग्री हि नेहमी मर्यादित स्वरूपाची असते. जेव्हा हे मर्यादित मन अशा पातळीवर येते की त्याला त्याच्या जाणीव आणि सामग्रीची मर्यादा स्पष्ट झाल्यामुळे ते अधिकची अपेक्षा करणे सोडून देते. आणि आता बस्स झाले असे म्हणते तेव्हा त्याला त्याच्या मर्यादेची अंतर्दृष्टी येते. या अंतर्दृष्टी मुळे ते मर्यादा उल्लंघन करू शकते. हि एक क्रांतिकारक घटना असते. आणि म्हणून ते आता मानवी मन राहिलेले नाही. मानवी मन आणि त्याची जाणीव हि मर्यादित असते, कुसंस्कारित झालेली असते म्हणून ती मुक्त नसते.
वैयक्तिक मन हे संपूर्ण मानवी चेतनेचा परिणाम आहे. वैयक्तिक मन हे मानवी चेतने मधून तयार झाले आहे. हि वास्तविकता लक्षात येणे खूप महत्वाचे आहे.
आता जे ‘मानवनिर्मित मन’ आहे, ते स्वतः त्याच्या मर्यादे पलीकडे जाऊन, स्वत:पासून पूर्णपणे मुक्त होऊ शकते का?
धर्म, देव, राष्ट्रवाद, विज्ञान, उपासना, प्रार्थना, चिंता, दु:ख, आसक्ती, अलिप्तता, एकटेपणा, दुःख, गोंधळ, वेदना आणि चिंता या सर्व गोष्टी मानवी मनाने निर्माण केल्या आहेत आणि त्यांनीच मानवी समाजात विकृती निर्माण केली आहे. मनुष्याने देवाचा शोध लावला आहे आणि त्याला अमर्याद काल्पनिक शक्ती दिली आहे आणि ती काल्पनिक शक्ती हिच मनुष्यावर वर्चस्व गाजवत आहे.
जेव्हा अंतर्दृष्टी येते आणि त्यामुळे जेव्हा जीवनात सुव्यवस्था येते, तेव्हा मेंदू आणि मनाची झालेली हानी हि पूर्ववत होत असते.
मानवी चेतना हि तिची स्वतःचीच सामग्री होय. चेतनेची सामग्री म्हणजे मानवनिर्मित सर्व काल्पनिक गोष्टी - धर्म, देव, राष्ट्रवाद आणि इतर सर्व. मन हे केवळ वैयक्तिक मन नसते तर ते संपूर्ण मानवी मनाची कॉपी असते.
अंतर्दृष्टी आली तर, ते मन स्वतःला अशुद्ध मानवी मनापासून शुद्ध करते. अंतर्दृष्टी म्हणजे चेतनेची सर्व अशुद्ध सामग्री पुसून टाकणे होय. बरोबर? थोडं थोडं पुसणे नाही, तर संपूर्णता पुसून टाकणे होय. आणि अशी अंतर्दृष्टी हि मानवी मनाच्या प्रयत्नांचे फळ नसते.
सार्वत्रिक आणि वैयक्तिक दोन्ही चेतना या मानवनिर्मित आहेत. आणि कोणालाही मानवी चेतनेच्या मर्यादा स्पष्ट दिसतात. एखाद्याचे मन त्या मर्यादेच्या खूप पुढे गेलं की, 'हे सगळं थोतांड एका झटक्यात किंवा एका हालचालीनं पुसून टाकावं' असं वाटण्याचा एक टप्पा येतो. आणि ती हालचाल म्हणजेच अंतर्दृष्टी होय, ती अंतर्दृष्टीची हालचाल असते. ती हालचाल चेतनेतून जन्माला आलेले नसते.
यानंतर जे मन शुद्ध झालेले आहे ते मानवनिर्मित मन राहिलेले नाही. मानवनिर्मित मन अंतर्दृष्टि प्राप्त करू शकत नाही, अशुद्ध मन शुद्ध मन निर्माण करू शकत नाही. शुद्ध मन हा भ्रम सुद्धा नाही आणि आताचे हे शुद्ध मन अमर्यादित आहे. तर हे शुद्ध मन, जे यापुढे सार्वत्रिक आणि वैयक्तिक राहिलेले नाही, आणि म्हणून ते मर्यादित राहिलेले नाही, आणि मर्यादा हि अंतर्दृष्टीद्वारे मोडली गेली आहे, आणि म्हणूनच शुद्ध मन हे आता भ्रमित केलेले मन राहिलेले नाही.
‘ हे शुद्ध मन म्हणजे देवता नाही ‘ या बाबत कमालीची सावधानता बाळगावी.
मानवनिर्मित मन हे नेहमी भ्रमात असते, ते नेहमी शुद्ध मनाचा शोध घेत असते आणि म्हणूनच ते अधिकाधिक भ्रम आणि गोंधळ निर्माण करत असते. या मानवनिर्मित भ्रामक मनाचा त्या शुद्ध वास्तविक मनाशी काहीही संबंध नसतो. मानवी मनाचा ते वास्तविक शुद्ध मन मिळवण्याचा कोणताही प्रयत्न हा भ्रमाचाच भाग असतो
ज्या मनाला अंतर्दृष्टी आलेली आहे, तेच शुद्ध मन हे ‘ मानवनिर्मित अशुद्ध मना ‘ पासून मुक्त होऊ शकते. कारण आता ते शुद्ध मन झाले आहे, पण ते मन / व्यक्ती हि दुसऱ्या व्यक्तीच्या मनावर प्रभाव टाकू शकत नाही !!!
( ना ईश्वर आहे, ना कोणी खरा गुरू आहे )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा