मुक्तावस्था

 


आत्मज्ञान म्हणजे तथाकथित अध्यात्मिक उच्च पातळीवर गणल्या गेलेल्या आत्म्याचे ज्ञान असे होत नाही. ते प्रत्येक क्षणाच्या आपल्या दैनंदिन वागणुकीत जी कृती होत असते, त्या क्षणाच्या नात्यात ते असते; आणि त्या आत्मज्ञाना शिवाय जीवनाचा योग्य अर्थ कळू शकत नाही.  

जर तुम्हाला तुम्ही स्वतः नेमके काय आहात हे माहित नसेल तर तुमच्याकडे जीवनाचा योग्य अर्थ लावण्यासाठी कोणताही आधार असत नाही. तुम्ही स्वतःला काल्पनिक विचारसरणी मधून नीट ओळखू शकणार नाही. तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवना मधील वर्तमानातील प्रत्येक क्षणाशी जोडल्या गेलेल्या संबंधांमध्ये स्वतःला योग्य ओळखू शकता. 

तुम्हाला माहित नाही का की तुम्ही दुःखात, संघर्षात जीवन जगत आहात? आणि ते वास्तव नाकारण्याचा, टाळण्याचा काय फायदा? जसे एखाद्या माणसाच्या शरीरात विष भिनले आहे आणि त्यामुळे तो हळूहळू मरत आहे? 

आत्मज्ञान ही सत्य ज्ञानाची सुरुवात आहे आणि त्या आत्मज्ञानाशिवाय तुम्ही फार दूर जाऊ शकत नाही; आणि परम, देव, सत्य किंवा तुम्ही जे म्हणत असाल ते शोधणे म्हणजे केवळ स्वतःच प्रक्षेपित केलेल्या कल्पनांचा शोध घेण्यासारखे आहे. म्हणून, तुम्ही तुमच्या जवळ जे आहे त्यापासून सुरुवात करायला हवी: तुम्ही जे बोलता त्या प्रत्येक शब्दाच्या जवळ जाऊन त्याच्या अर्थाचा शोध घेतला पाहिजे, तुमच्या प्रत्येक कृती, तुम्ही कसे बोलता, तुम्ही कसे वागता, तुम्ही कसे खाता - निंदा न करता प्रत्येक गोष्टीची जाणीव ठेवा; मग त्या जाणीवेतून तुम्हाला कळेल की प्रत्यक्षात वास्तव काय आहे आणि ‘जे वास्तव आहे’ त्याचे आकलन झाल्याने त्याचे रूपांतर होणे हीच मुक्ततेची सुरुवात आहे.

मुक्ती म्हणजे जीवनाचा शेवटचा टप्पा नाही. मुक्ती म्हणजे प्रत्येक क्षणी काय होत आहे हे समजून घेणे - ती समज जेव्हा मन मुक्त असते तेव्हा होत असते, मनाला मुद्दाम मुक्त करण्याच्या प्रयत्नात ते शक्य होत नाही. केवळ एक मुक्त मनच शोधू शकते, श्रद्धेने घडवलेले किंवा आदर्श संकल्पनेनुसार आकारलेले मन शोध घेऊ शकत नाही. असे मन सत्य शोधू शकत नाही. जर जीवनात संघर्ष असेल तर तेथे मुक्तावस्था असू शकत नाही, कारण संघर्ष म्हणजे नातेसंबंधात मनाच्या स्वार्थी वृत्तीचे स्थिरीकरण होय.

जे. कृष्णमूर्ती,

भाषण ३, राजमुंद्री, ०४ डिसेंबर १९४९.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मानसिक मृत्यू हाच सत्य साक्षात्कार करण्याचा एकमेव मार्ग आहे

मी कोण आहे?

जीवनाची जटीलता